माहिती

Home / माहिती

मै कैलास का रहनेवाला ।

मै कैलास का रहनेवाला । मेरा नाम है शंकर ॥
दुनिया को समझाने आया । करले कुछ अपना घर ॥

यह दुनिया मे कई रंग है । यह रंग निराला है ॥
पाया न भेद किसने । यह गहराही गहरा है ॥

मुझे वोही जानता है । जो खुद को समझता है ॥
कुर्बान करी भी दौलत । तो भी सवाल अधुरा है ॥

समझे तो समझ ले । बाद मे पछताना है ॥
हमारा क्या बिघडता है । तेराही नुकसान है ॥

लिखी पत्थर की दिवारों पर । सुन्ना की लकीरें ॥
वक्त आने पर याद होंगे । हमारे ही फव्वारे ॥

श्री सद्गुरु शंकर महाराजांची आरती

आरती शंकर श्री गुरूंची ! करू या ज्ञानसागराची !!
उजळल्या पंचप्राण ज्योती ! सहजचि ओवाळू आरती !
मिटवूनी क्षणिक नेत्र पाती ! हृदयी स्थितः झाली गुरुमूर्ती !
श्री गुरु दैवत श्रेष्ठ जनी ! जणू का भाविकास जननी !!
संस्कृती पाशसहज करी नाशमुक्त दासास !
करी कामधेनु आमुची ! करू या ज्ञानसागराची !! १!!

आरती शंकर श्री गुरूंची ! करू या ज्ञानसागराची !!
ध्यान हे रम्य मनोहर से ! ध्यान धृड जडले नयनिसे !
भक्त हृदयाकाशी विलसे ! तेज ब्रम्हांडी फाकतसे !
पितांबर शोभवित कटीला ! भक्त मालिका हृद पटला !!

भक्त जन तारीनेई भवतीरीपतित उद्धरी !
करू नित्य सेवा चरणांची ! करू या ज्ञानसागराची !! २ !!

आरती शंकर श्री गुरूंची ! करू या ज्ञानसागराची !!
लक्षी जग प्रचंड नीज नयनी ! लक्षी ब्रम्हांड हृद्य भुवनी !!
हरिहर विधीदत्त त्रिगुणी ! आठवी नित्यभूवन सुमनी !!
दत्तमय असे योगिराणा ! ओम कारीचे तत्व जाणा !!
धारा दृढचरणदास उद्धरणजनार्दन शरण !
आस पुरवावी दासांची ! करू या ज्ञानसागराची !! ३ !!
आरती शंकर श्री गुरूंची ! करू या ज्ञानसागराची !!

ll अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू शंकरबाबा महाराज कि जय ll

।।”स्थानमाहात्म्य।।

मुक्काम पुणे. सन १९४६ मध्ये घडलेली घटना. श्री शंकर महाराज यांनी काही निवडक भक्तांना आपल्यासोबत घेतले आणि ते पुणे शहराबाहेर देवी पद्मावतीच्या मंदिरामध्ये आले. सर्वांनी पद्मावतीचे दर्शन घेतले. श्री महाराज तिथे काही काळ थांबले. ते काही काळ थांबून माघारी परततील असा भक्तांचा समज झाला मात्र श्री महाराज मंदिरातून बाहेर येण्याचे नाव काढेनात. बऱ्याच वेळाने अचानक ते उठले, बाहेर आले आणि झपाझप पावले टाकत सातारा रस्त्याच्या दिशेने लागले. बऱ्याच वेळाने ते एका शेतापाशी थांबले व म्हणाले, “ही जागा गावापासून दूर आहे. पद्मावतीमातेच्या निकट आहे. समाधी घेण्यासाठी हे योग्य स्थान आहे तेव्हा मी येथेच समाधी घेणार !’ श्री महाराजांचे हे शब्द कानी येताच तिथे उपस्थित असलेल्या भक्तांच्या पायाखालची जमीन सरकली. श्री महाराजांच्या मुखातून आलेले वचन म्हणजे ब्रह्मवाक्य, त्यात बदल होण्याची सुतराम शक्यता नाही तेव्हा, श्री महाराज आपल्याला सोडून जाणारच या विचाराने भक्त कासावीस झाले.

तत्पूर्वी, एकदा १९३० साली नगर येथील मुक्कामात श्री महाराजांनी समाधिस्थ होण्याचा निर्णय घेतला मात्र तिथल्या भक्तांचे आर्जव लक्षात घेत श्री महाराजांनी त्यांचा निर्णय १७ वर्षांसाठी पुढे ढकलला. पुढे १९४७ साल उजाडले तेव्हा श्री महाराजांनी तोच निर्णय पुन्हा बोलून दाखविला. “यावेळी नगरकर भक्तांप्रमाणेच आपणही श्री महाराजांना कळकळीची विनंती केल्यास ते त्यांचा निर्णय रहित करतील’ असे पुणेकर भक्तमंडळींच्या मनात आले मात्र, या खेपेस श्री महाराज कुणाचे काही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हते. त्यामुळे त्यांनी निश्चित केलेला “वैशाख शुद्ध अष्टमी, सोमवार’ चा दिवस उजाडण्याची वाट पाहाणे इतकेच भक्तांच्या हाती काय ते शिल्लक उरले.

वैशाख शुद्ध सप्तमी, सन १९४७. श्री शंकर महाराज सकाळी उठले. चहा झाल्यावर काही वेळाने ते ढेकणे मामींना म्हणाले, “छोटीशी गादी घाला. एक तक्क्या ठेवा. मी आता येथे बसणार आहे. मला कुणाशीही बोलायचे नाही. कुणालाही भेटायचे नाही. तेव्हा कुणाला हे दार उघडू देऊ नका.’ श्री महाराजांनी स्नान केले आणि ते ढेकणे मामांनी आतील खोलीत अंथरलेल्या गादीवर जाऊन बसले. सकाळचे दहा वाजले होते. श्री महाराजांच्या आज्ञेनुसार खोलीचे दार बंद करण्यात आले. ढेकणे मामा-मामी तो दिवस आणि रात्र दाराबाहेरच थांबून होते.

वैशाख शुद्ध अष्टमी. जेमतेम पहाट होते तोवर श्री महाराजांचा संदेश आला, “पुढील सोय करा, ही आत्मज्योत आता बाहेर पडत आहे.’

श्री महाराजांचा निरोप ढेकणे मामांनी नजीकच्या भक्तांपर्यंत पोहोचवला. श्री महाराजांनी देह त्यागला ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली. श्री महाराजांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी ढेकणे मामांच्या घरी भक्तांचा महापूर लोटला. साश्रुपूर्ण नयनांनी सर्वजण श्री महाराजांचे मुखदर्शन घेत होते. प्रत्येकाचा कंठ दाटून आला. श्री महाराजांनी सर्वांवर आईच्या मायेने प्रेम केले आणि तीच आई आज आपल्या बाळांना सोडून निघून गेली होती. कुणी हुंदके देत होते तर कुणी कपाळ बडवून घेत होते. ढेकणे मामांचे घर अक्षरशः दुःखाचा अमर्याद सागर झाले.

श्री महाराजांच्या परगावी राहणाऱ्या भक्तमंडळींना तारा पाठविण्यात आल्या. श्री महाराजांच्या दर्शनार्थ भक्तांचा लोंढा उसळून येत होता. त्यातील अनेकांना श्री महाराजांच्या समाधिस्थ देहाच्या अनेकविध लीला अनुभवण्यास मिळाल्या. श्री महाराजांचा देह रथामध्ये ठेवण्यात आला. अंतयात्रेची तयारी सुरू झाली. श्री शंकर महाराजांना अखेरचा निरोप देण्यासाठी बाबू गेनू चौकामध्ये भक्तांची अभूतपूर्व गर्दी झाली. ढेकणे मामांच्या घरातून निघालेली ही अंतयात्रा काका हलवाई दत्तमंदिराजवळ थांबून पुढे मंडई नजीकच्या श्री अक्कलकोट स्वामी महाराजांच्या मठाजवळ थांबली. श्री महाराजांचे हे नित्यनेमाने येण्याचे स्थान होते. श्री स्वामीरायांचा निरोप घेऊन अंतयात्रा शनिपार व पुढे भिकारदास मारुती मंदिरापाशी आली. रस्त्यावर दुतर्फा श्री महाराजांचे दर्शन घेण्याकरिता शोकाकूल भक्तगण उभे होते. विविधरंगी फुलांनी झाकलेला श्री महाराजांचा देह शांतपणे मार्ग आक्रमीत होता. त्यासोबत चालणाऱ्या भक्तांना दुःखाचा आवेग आवरणे निव्वळ अशक्य होते. टाळ मृदंगाच्या गजरात भजन म्हणत, जयघोष करीत निघालेली ही श्री शंकर महाराजांची लेकरे पर्वती, अरण्येश्र्वर येथून अखेर पद्मावती परिसरात आली. पद्मावती मातेच्या सान्निध्यात काही काळ राहून सर्व भक्तगण समाधीस्थानी पोहोचले. पूज्य श्रीरावसाहेब सहस्त्रबुद्धे व पूज्य श्री मारुतीराव माळी महाराज यांच्यासारखे सत्पुरुष गुरुबंधूला निरोप देते झाले. श्री महाराजांना समाधीस्थानी ठेवण्यात आले व जड अंतःकरणाने त्यांच्या देहावर माती लोटण्यात आली. अशा रितीने, थोर सिद्धसत्पुरुष श्री शंकर महाराज यांच्या देहावताराची समाप्ती झाली.

वास्तविक पाहता, श्री शंकर महाराज सहजसंचारी होते. त्यांचे येणे-जाणे सर्वत्र व सर्वदूर होत असे. मात्र तरीही, त्यांच्या अधिकाधिक वास्तव्याचा काळ सोलापूर, अहमदनगर या भागात होता. पुणे येथे देखील अनेक भक्तांकडे श्रीमहाराजांचे अधूनमधून वास्तव्य होत असे. असे असतानाही श्री शंकर महाराजांनी समाधी घेण्याकरिता पुणे शहराच्या बाहेर सातारा रस्त्यावर, पद्मावती परिसरातील निर्मनुष्य, एकांत स्थळ निवडले. त्याकाळी म्हणजेच, १९५० च्या दशकात पद्मावतीचा परिसर जंगलसदृश होता. श्वापदांचा नित्य वावर या परिसराला नवा नव्हता. पुणे शहराचा विस्तार तेव्हा फार मोठ्या प्रमाणात झाला नसल्याने धनकवडी, पद्मावती परिसर सर्वसामान्यांकरिता तसा अपरिचित होता. मात्र गेल्या तीनेक दशकामध्ये याच परिसराचे रुपडे पालटले आणि आज “धनकवडी’ हे पुणे शहराच्या केंद्रस्थानी आले आहे.

आज “धनकवडी’ येथील श्रीशंकर महाराजांचे समाधीस्थान हे केवळ पुण्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील जागृत स्थानांपैकी महत्त्वाचे “पुण्यक्षेत्र’ मानले जाते. दर महिन्याची दुर्गाष्टमी, श्री शंकर महाराजांची पुण्यतिथी व सण-उत्सवादी कार्यक्रमात हजारो भाविकांची गर्दी येथे पाहावयास मिळते. भक्तजनांना, श्री शंकर महाराजांच्या चैतन्याची अनुभूती करवून देणे हेच या स्थानाचे खरे “माहात्म्य’ आहे.

विवेक दिगंबर वैद्य (vivekvaidya1878@gmail.com) दैनिक सामना (१६/०५/२०२१)

महाराजांनी सांगितल्या प्रमाणे अष्टमीला आपला देह सोडला. संपूर्ण पुण्यात बातमी पसरली भक्तांचे लोंढे धावत आले. भक्तांना रडू आवरे ना. न्यायरत्न विनोद तांब्याची तर घेवून आले. त्यांनी एक टोक महाराजांच्या छातीला आणि दुसरे टोक कानाला लावले. त्यातून आवाज आला. आत्मकलेपैकी एक कला जगकल्याणासाठी समाधी स्थानांत सदैव राहील आणि माउलीचा आशीर्वाद जो जे वंचील तो ते लाहो प्राणिजात. ज्ञाननाथ रानडे यांना महाराजांचा संदेश आला. आळंदी, जंगली महाराज, माळी महाराज, सोपानकाका, ओमकारेश्वर व पद्मावती या ठिकाणचे निर्माल्य माझ्या समाधी स्थानात आणून टाकावे. ज्ञाननाथ रानडे यांनी गाडी घेवून अडीच तासात निर्माल्य आणले. मामा ढेकणे व मामी यांना दु:खाचा वेग आवरेना. त्यांच्या घरापासून काका हलवाई दत्त मंदिर ग्लोब सिनेमा, अक्कलकोट स्वामी मठ, मंडई, शनिपार पर्वती, अरणेश्वर, पद्मावती आणि शेवटी मालपाणीच्या शेतात धनकवडीला महाराजांची अंतयात्रा आली. भस्मे काका, दादा फुलारी, डॉक्टर शुक्ला, डॉक्टर धनेश्वर या चौघांनी महाराजांचा देह खांद्यावर घेवून समाधीच्या जागेपर्यंत आणला. त्या वेळी दादा फुलारीना शंकर महाराजांनी आपल्या हाताच्या कोपराने धक्का दिला व म्हटले अरे मला निट धर. फुलारी दादांनी दचकून महाराजांकडे पहिले. समाधीत ठेवताना मारुती माळी महाराजांनी त्यांचे अखेरचे दर्शन घेतले. त्यांना ते बजरंगबलीच्या रुपात दिसले. सायंकाळी ५ वाजण्याच्या सुमारास महाराजांच्या पार्थिव देहाला समाधीत ठेवले. अनंतकोटी ब्रह्म्हांडनायक राजाधिराज योगीराज सदगुरू श्री शंकर महाराज कि जय अश्या घोषात टाळ मृदुंगाच्या गजरात आसमंत निनादून गेला. (वरील हे वर्णन ज्ञाननाथजीच्या पुस्तकातील आहे.)

धनकवडीचे शंकर महाराज .. प्र.ल.गावडे

संत समागम फळला बा मला ! सन्मानाचा झाला लाभ मोठा ! या संत नामदेवमहाराजांच्या वचनाची प्रचिती यावी आसा योग माझ्या जीवनात वयाच्या तेराव्या चौदाव्या वर्षी आला होता. सन १९३७ – ३८ चा तो कालखंड होता ! अहमदनगर येथील सुप्रसिध्द सरदार मिरीकर यांच्या वाड्यांत मी त्यावेळी रहात होते. नगरच्या सोसायटी हायस्कूल मध्ये मी शिक्षण घेत होतो. सरदार नानासाहेब मिरीकरांचा तो खानदानी वाडा विविध साधुसंतांच्या मधून मधून होणाऱ्या वास्तव्याने भक्तप्रसाद बनला होता.

अक्कलकोट स्वामींचे सप्ताह त्याच वाड्यात थोरामोठ्यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही लहान मुले उत्साहाने साजरे करीत असू. अक्कलकोटात हिरवा मका! स्वामी सुखा विसरु नका अशा पालूपदाचा ताल धरीत आम्ही महाराजांचे सप्ताह साजरे करीत असू. अशा त्या वाड्यात एक दिवस आम्हांस श्रीशंकर महाराजांचे दर्शन झाले.

मिरीकरांच्या वाड्यातील आम्ही मुलांनी प्रथम जेव्हा महाराजांना पाहिले तेव्हा काहीसे बावरुन गोंधळून गेलो होतो. कारण महाराजांचा देह अष्टवक्र होता. ते अजानुबाहू असल्याने त्याचे दोन्ही हात गुडघ्याच्याही खालपर्यत आलेले दिसायचे ! इतर साधू संन्याशाप्रमाणे त्यांच्या अंगात भगवी कफनी नव्हती, तर पुढे सोगा सोडलेले पांढरे स्वच्छ धोतर व अंगात सैलसर सदरा, गळ्यात रुद्राक्षाची माळ, दाढी व केस वाढलेले, डोळे किंचित मोठे, बोलण्यातही क्वचित अस्पष्टता असे शंकरमहाराजांचे ते सोवळे रुप पाहून प्रथमतः आम्ही सर्व मुले मनोमनी काहीसे घाबरुन भेदरुनच गेलो होतो. पण ही भीती महाराजांशी अधिक जवळीक झाल्यावर पूर्ण नाहीशी झाली आणि महाराजांचे सवंगडी होण्याचे महत्भाग्य आम्हा सर्व मुलांना लाभले.

स्वतः शंकरमहाराजांनी मै कैलास का रहनेवाला, मेरा नाम है शंकर ! असे आपले मूळ स्थान व नाम सांगितले होते, नाशिक जिल्ह्यांत अंतापूर नावाचे गाव आहे. तेथे श्री चिमणाजी आणि त्यांची पत्नी या दोघांची शिवाची उपासना चालू होती. एका साधूने त्यांना भविष्य सांगून असा दृष्टांत दिला की रानाच्या गर्द झाडीत जा तिथे तुला एक बालक दिसेल. दृष्टांता प्रमाणे ते दोघे पती-पत्नी रानात गेले. तिथे वृक्षाखाली वाघाच्या सान्निध्यात एक बालक खेळताना दिसले. ते त्यांनी घरी आणले. शंकराचा प्रसाद म्हणुन, त्यांनी बालकाचे नाव शंकर ठेवले.

शंकर महाराज यांच्या बाललीलांतून त्यांच्यातील दैवी गुणांची कल्पना त्यांच्या माता-पित्यांना येत होती. महाराजांना भजन कीर्तनाची गोडी होती. हिस्त्रपशूंच्या सान्निध्यात ते क्रिडा करीत. त्यांना वाचासिध्दीही प्राप्त झाली होती. त्याच वाचासिध्दीच्या बळावर त्यांनी आपल्या मातापित्यांना आशीर्वाद दिला की, तूम्हाला जुळी संतती होईल! तो आशीर्वाद पुढे खराही ठरला. नंतर शंकर महाराजांनी सर्वत्र भ्रमंती सुरुकेली. हिमालयातील केदारेश्वर प्रयाग! इत्यादी तीर्थ क्षेत्रांतुन त्यांचा प्रवास झाल्यावर त्यांच पहिलं प्रकटन सोलापूर येथे शुभराय महाराजांच्या मठांत झालं तत्पूर्वी अक्कलकोट, त्र्यंबकेश्वर, नाशिक हैद्राबाद तुळजापुर, औदुंबर, श्रीशैल अशा स्थानी त्यांनी भ्रमंती केली.

श्री शंकरमहाराज योगिराज होते याचा अनेकांनी विविध प्रकारे अनुभव घेतला आहे. तथापि ते स्वतः मात्र वारंवार सांगत “सिध्दिच्या मागे लागू नका”. ते स्वतः खऱ्या अर्थाने सिध्दिच्या मागे लागले नाहीत. पण त्यांच्या ठायीचे अलौकिकत्व चिकित्सक बुध्दिवानांनाही मान्य होते. स्वतः जे कृष्णमुर्ती हे त्या दृष्टीने त्यांच्याकडे आकृष्ट झाले होते. तसेच न्यायरत्न धुंडिराजशास्री विनोद, आचार्य प्र. के. अत्रे, बालगंधर्व इत्यादी मान्यवरांना त्यांच्या ठायीचे योगसामर्थ्य प्रचीत होते. शंकर महाराजांचे शिक्षण, अध्ययन किती झाले होते हेही ज्ञात नाही. पण काही दीडशहाण्या विद्वानांना त्यांनी अस्खलित इंग्रजी भाषेतून उत्तरे दिली. महाराजांच्या अनेक चमत्कारांची अनुभूती काही भक्तांना आली आहे. माझे भाग्य असे की, त्यांच्या सहवासात राहण्याची, त्यांच्याबरोबर बोलण्या चालण्याची, त्यांच्याशी खेळण्याची, भोजन करण्याची सुसंधी मला मिळाली मला मिळाली होती.

श्रीशंकरमहाराज व सरदार नानासाहेब मिरीकर यांची प्रथम भेट झाली. ती चंद्रभागे च्या वाळवंटात ! हा मोठा विलक्षण योगायोग होता. या भेटीचे तपशीलवार वर्णन सेवाव्रती सरदार नानासाहेब मिरिकर या ग्रंथात कै. रा. गो. तथा बाबासाहेब मिरिकर यांनी पुढील शब्दांत केले आहे. एक वेडसर दिसणारा, शरीर अष्टवक्र असलेला, बावळट चेहऱ्याचा मनुष्य नानासाहेब मिरिकरांच्या जवळ हसत उभा होता. नानासाहेबांना वाटलं, ‘हा कोण वेडा? त्यांनी आपल तोंड दुसरीकडे वळविलं. ती व्यक्ती नाना साहेबांकडे पाहून पोरकट पणे हसत होती. तोच पाचपंचवीस माणसे त्या व्यक्ती कडे धावतच आली व त्यांच्या पाया वर डोकं ठेवण्यासाठी त्यांची झुंबड उडाली. त्यांतील एका माणसानं नानाहेबांना सांगितलं, ‘हे महान योगी शंकर महाराज आहेत’. पुढं या वेडसर दिसणाऱ्या माणसानं “आम्हाला मिरिला यायच आहे” अशी इच्छा व्यक्त केली. मग नानासाहेबांनी आपल्या गाडीत बसवून त्यांना मिरिला आणलं. त्यांनी त्या वेडसर दिसणाऱ्या व्यक्तीचा जवळून अभ्यास करुन ते महाराजांना सद्गुरु मानावयास लागले. त्यांनी महाराजांवर एक अभंग रचला –

वेष घेतला बावळा, अंतरी शुध्दज्ञानकळा | ऐसा सद्गुरु लाघवी, नानारंगी जन खेळवी |
बाल पिशाच्य उन्मत्त, लीला दावी तो विचित्र | लूळा पांगळा, जडमूढ,सांगेना अंतरीचे गुढ |
शंकरदासाचे लक्षण, तेथे राहे नारायण ||

अशा योगिराज महाराजांना मी नगर येथील मिरिकरांच्या वाड्यात लहानपणी पाहिले होते .महाराज आम्हा मुलांशी शिवाशिवी खेळतांना  परब्रह्म निष्काम या अभंगातील बालकृष्णाच्या बालक्रिडेची आठवण देत नाना साहेब आम्हा मुलांना प्रोत्साहान देत. त्या काळात महाराजांनी आम्हा मुलांना सांगितलेले काही विचार अजून स्मरतात. महाराज म्हणाले ‘देवाला प्रसन्न करण्यापेक्षा तुमच्यातील देवत्व प्रकट करा. तुमच्यातील काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर यांना तिलांजली दिलीत, की तुमच्यातील देवत्व प्रगट होईल. देव बाहेर शोधण्यास आपली शक्ति वाया घालवू नका. या शक्तिचा उपयोग आपल्यातील दुर्गुण घालविण्यासाठी करा. म्हणजे आतूनच देवत्वाची प्रभा बाहेर पसरु लागेल. अरे, आचरण महत्वाचं. ग्रंथवाचन निअभ्यास आचरणात येईल तेवढाच करा. माता-पित्यांची सेवा करा. कुलदेवतेची आराधना करा. यापेक्षा अधिक काही नको.’

इंग्रजी दिनांक २४ एप्रिल १९४७ (वैशाख शुध्द अष्टमी) रोजी श्रीशंकर महाराजांनी समाधी घेतली. भारतीय कालगणने नुसार वैशाख शूध्द, अष्टमी शके १८६९ हा त्यांचा समाधीचा दिवस. श्री शंकरमहाराजांचा थोडा सहवास घडला. शब्द कानी पडले. त्यांचे आचरण पाहावयास मिळाले. म्हणूनच संत समागम फळला बा मला ! सन्मानाचा झाला लाभ मोठा !” असे जे म्हटले आहे त्याचा प्रत्यय घेण्याचे भाग्य मला कळले.

डॉ धनेश्वर – श्री शंकर महाराजांचे परम शिष्य डॉक्टर नागेश रा. धनेश्वर यांचा अनुभव

डॉ. धनेश्वरच्या जन्माअगोदर महाराजांनी त्यांच्या वडिलांना आशिर्वाद दिला. तुझ्या पोटी शिकलेला योगी जन्माला येईल. तेच डॉ. धनेश्वर होत ! ते प्रथम श्रेणीतील MBBS पास होते. डॉ. धनेश्वरांच्या दवाखान्यात महाराज येऊन बसत. एक खेडवळ माणूस बाकावर पाय ठेवून बसून असतो. म्हणून काही पेशंटनी डॉक्टरांकडे तक्रार केली व ह्या माणसाला घालवून द्या म्हणून सांगितले. त्यावर डॉक्टर म्हणत, ‘अहो ते माझे गुरू आहेत. ते येतात म्हणून माझा धंदा चालतो व तुम्हाला गुण येतो.

माझी श्रद्धा आहे त्यांच्यावर !’ महाराजांवरील डॉक्टरांची भक्ती दिवसेंदिवस वाढत होती. एक दिवस त्यांच्या आयुष्यातील महत्त्वाचा ठरला. महाराजांना त्यांना काहितरी द्यायचे होते. त्या दिवशी बाजारही होता. महाराज दवाखान्यात आले. त्यांनी डॉ. धनेश्वरना सांगितले, “गावाबाहेर वेश्यांची वस्ती आहे. तेथे शांताबाई नावाची वेश्या श्री स्वामी भक्त आहे. तीला भरलेल्या बाजारातून हाताला धरून आण.

मी दवाखान्यात थांबतो.” “संताच्या घरची उलटी खुण” हे डॉक्टर साहेबांना माहीत होते. त्यांनी महाराजांच्या सांगण्याप्रमाणे केले.वेश्या वस्तित तिच्या माडीजवळ जाऊन शांताबाईंना हाक मारली. ती बाहेर आल्यावर तुला शंकर महाराजांनी बोलवले म्हणुन सांगितले. तिने कुंकवाचा करंडा पदरात घेतला व डॉक्टर साहेबांबरोबर हात धरून निघाली. गावाचा बाजाराचा दिवस. प्रचंड गर्दी अशा परिस्थितीत लोकांच्या नजरेतून डॉक्टर सुटले नाहीत. लोक टिंगल करू लागले. “शांताबाई वेश्या व डॉक्टरांचे लफडे आज समजले” अशी वाक्ये लोक बोलू लागले. ती दोघे दवाखान्यात आली. महाराजांनी दोघांना दवाखान्यात बसवले. डॉक्टर घनेश्वरांच्या डोक्यावर हात ठेवला व त्यांना अष्टमहासिद्धी बहाल केल्या. त्याचबरोबर शांताबाईंना सद्गुरु भक्तीचा प्रसाद दिला. दोघे धन्य झाले. हे झाल्यावर डॉक्टरांनी महाराजांना स्पष्ट विचारले “महाराज एवढे आज मला दिले, धन्य धन्य झालो. पण उद्या पासून मला गावात दवाखाना चालवायला नको. माझी सर्वत्र टिंगलटवाळी सुरू आहे.”  त्यावर महाराज म्हणाले “वेड्या तु संपूर्ण आयुष्यभर जेव्हढ्या टिंगलटवाळ्या केल्यास त्या शिल्लक होत्या. त्या जोपर्यंत जात नव्हत्या तोपर्यंत तू निष्कलंक होत नव्हतास. त्या आता मी लोकांना परत केल्या. तुला मुक्त केले. आजपासून तुला जे प्राप्त झाले ते संभाळ आणि यापुढे कोणाची टिंगलटवाळी करू नकोस”
ह्या महाराजांच्या उपदेशाची त्यांनी आयुष्यभर जपणूक केली.

आप्पां जवळ एक शाडूचा बालकृष्ण होता. ते त्याची नित्यनेमाने षोडशोपचारे पूजा करीत. मनोभावे केलेल्या त्यांच्या पुजेने काही दिवसा नंतर बालकृष्ण आप्पांशी बोलू लागला. त्याला ठेवलेला गुळ खोबऱ्याचा नैवेद्य तो देव्हाऱ्यातून खाली ऊतरून खाऊ लागला. त्याच्या या बाल लीला पाहुन आणी मधुर बोल ऐकून आप्पांना अत्यंत आनंद झाला. त्याना वाटू लागले, ‘आपण नामदेवाच्या योग्यतेचे झालो. ही शाडूची निर्जीव जड मुर्ती भक्तिने सजीव झाली आहे. पण लगेच त्यांची चिकीस्तक बुद्धी म्हणु लागली, तुझ्या कल्पनेचे खेळ नसतील कशावरून? हे जर खरच घडत असेल तर कृष्णानं काहीतरी खूण दाखवली पाहिजे. दुसऱ्याच दिवशी तशी खूण मिळाली. नैवेद्य खाऊन त्या गोंडस करकमलातलं सोन्याचं कडं बाळकृष्णानं ताटात ठेवून दिलं. प्रत्यक्ष वस्तू देऊन प्रचिती आणून दिली. तरीही आप्पांचं समाधान झालं नाही. ते विचार करू लागले. घडल्या घटनांचा शोध अंतर्यामी घेऊ लागले. आणि त्यांना एकदम जाणवल की हा सारा आपल्या प्रगाड ईच्छा-शक्तिचा खेळ आहे दुसरं काही नाही. झालं! लगेच ते उठले आणि त्यांनी त्या कृष्णमुर्तीचे तुकडे तुकडे करुन खिडकीतून फेकून दिले. आणि नवल असं की, त्याच वेळी शंकर महाराज त्यांच्यासमोर येऊन उभे राहिले. लहान मुलासारख्या टाळ्या पिटीत आनंदानं म्हणू लागले, “डाँक्टरचा देव मेला, डाँक्टरचा देव मेला!!” आप्पा म्हणाले, “सत्य आहे महाराज. देव मेला आणि मरताना तो डाँक्टरचा अहंकार बरोबर  घेऊन गेला. किंबहूना बाळकृष्ण नव्हे, अहंकारच मेला.”

सद्गुरू श्री शंकर महाराज यांचे वचन, “रंग क्या जाने, रंगारी भडवा क्या जाने पिंजारी”

शंकर महाराजांचे वचन याबद्दल बोलायचे झाल्यास त्यांना कदाचित असे म्हणायचे असेल की, माझ्या रंगात रंगणार तोच मला ओळखणार. असे अनेक भक्त होते की त्यांच्या रंगात रंगून गेले होते. आजही अशी अनेक लोक आहेत त्यांना महाराजांनी आपल्या रंगात रंगवून घेतले आहे. डॉक्टर धनेश्वर पेशावर डॉक्टर पण त्यांची भेट महाराजांशी झाली आणि डॉक्टर त्यांच्या रंगात रंगूनच गेले.

महाराजानी त्यांना सोळा, सतरा विद्या शिकवल्या पण त्यांनी कधीच त्याचा उपयोग स्वतःसाठी केला नाही. कारण त्यांनी महाराजांची लीला अगाध आहे हे जाणले होते.

प्रधान हे उच्चशिक्षित होते. त्यांना महाराजानी आस्तिक केले. महाराजानी प्रधानांना आपल्या सारख बनवलं. त्यांना अनेक देवी देवतांची दर्शने महाराजांनी घडवली

होती. आळंदीमध्ये प्रधान गेले असता अल्लख म्हणता समाधीतून माऊली प्रकट होऊन त्यांनी प्रधानांना दर्शन दिले होते. म्हणजे भक्तांना आपल्या रंगात रंगवून आपल्यासारखे करणारे महाराजच.पुण्यात आप्पा बळवंत चौक प्रसिद्ध आहे. आप्पा बळवंत मेहेंदळे यांचा वाडा चौकातच होता. मेहेंदळे यांच्या घराण्यातील ‘ताईसाहेब मेहेंदळे’ शंकर महाराजांमुळे प्रसिद्धीस आल्या. एक दिवस शंकर महाराजांनी ताईसाहेब मेहेंदळे यांच्या गळ्याला बोटाने स्पर्श केला नि सांगितले, ‘ज्ञानेश्वरी सांग.’ त्यानंतर ताईसाहेब ज्ञानेश्वरीवर प्रवचने करू लागल्या. मेहेंदळे वाड्यात वरती माडीवर मोठा दिवाणखाना होता. तिथे ही प्रवचने चालत. तो मोठा दिवाणखाना श्रोत्यांनी भरून जात असे. त्यांच्या मुखातून साक्षात सरस्वती अवतरायची. त्या ज्ञानेश्वरी सांगत, पण ज्ञानेश्वरीची काव्यमयता, शास्त्रीयता, वैचारिक सुसंगती नि झेप त्यांच्या प्रवचनांतून अनायासे प्रकट होई. विशेष असे की, त्यांचे पतीही त्यांची ज्ञानेश्वरी ऐकायला बसत. ताईसाहेब मेहेंदळ्यांची प्रवचने ऐकायला काही वेळा शंकर महाराजही येत. मेहेंदळे पती-पत्नीची त्यांच्यावर प्रगाढ श्रद्धा होती. श्री शंकर महाराजांची अतिशय साधी शिकवण असे. ते म्हणत, ‘अरे! आचरण महत्त्वाचे! ग्रंथांचे वाचन नि अभ्यास आचरणात येईल तेवढाच खरा!  ‘भावनेने भिजलेले असेल, ते भजन!’ त्यांनी अनेकांना सांगितले, ‘माता-पित्याची सेवा करा. कुलदेवतेची आराधना करा. यापेक्षा अधिक काही नको.’

मामा ढेकणे महाराजांचे एक निस्सीम भक्त होते. महाराजांचं त्यांच्यावर फार प्रेम. ते केव्हातरी म्हणायचे, “मामाचं आम्ही पूर्वजन्मातलं देणं लागतो. ते फेडायचं आहे आता.” मामा खडकीच्या अँम्युनिशन फॅक्टरीत नोकरीला होते. पत्नी, दोन मुलगे आणि एक मुलगी एवढं त्यांचं कुटुंब पुण्याला बाबू गेनू चौकात असलेल्या शिवराम महादेव परांजपे यांच्या वाड्यात बिऱ्हाडानं राहत. सांपत्तिक स्थिती तशी साधारणच. घर लहानसं. रस्त्याच्या बाजूला भिंतीला दोन खिडक्या. त्यांतून आत येईल तेवढाच उजेड. जमीन ओबडधोबड. शेणानं सारवलेली. त्यावर अंथरलेली सतरंजीही जुनीच. भिंतीला टेकून ठेवलेला एक फाटका मळका लोड. भिंतीतल्या कोनाड्यांत आणि खुंट्यांवर बाकीचं सामान ठेवलेलं. पण ह्या बाह्य गोष्टींचा विचार महाराजांच्या मनाला कधी शिवायचाही नाही. ते रावसाहेब मेहेंदळ्यांच्या वैभवसंपन्न दिवाणखान्यात ज्या सहजतेनं बसायचे, मोतीवाल्या लागूंच्या घरी पांढऱ्याशुभ्र बैठकीवर ज्या प्रेमानं पहुडायचे त्याच प्रेमानं आणि तितक्याच सहजतेनं ते मामांच्या घरी फाटक्या सतरंजीवरही आरामात बसायचे. लहर लागेल तेव्हा त्यांच्या घरी राहायलाही जायचे.

बाबुराव रुद्र हे महाराजांचे निस्सीम भक्त. त्यावेळी त्यांनी समाधीचे वन्य प्राणी, पाऊस यांच्या पासून तिथे दिवस रात्र राहून संरक्षण केले. पुण्याच्या लकडी पुलावर एक गृहस्थ रोज महाराजांच्या सोबत गप्पा मारत बसायचा. दोघांची चांगली मैत्री जमली. गृहस्थाने महाराजांना एके दिवशी त्यांचे नाव व कोठे राहतात हे विचारले. महाराजांनीही त्याला आपले नाव शंकर महाराज आहे व मी धनकवडी मठात राहतो असे सांगितले. पुढे दोन दिवस महाराज पुलावर आले नाहीत म्हणून तो मनुष्य धनकवडी मठात येतो व विचारतो शंकर महाराज कोठे आहेत?  बाबुराव रूद्र त्यांना सांगतात की ही शंकर महाराजांची समाधी आहे. ऐकुन गृहस्थ थक्क होतो. तो रुद्रांना सांगतो, की महाराज रोज लकडी पुलावर येतात. ते आज आणि काल आले नाहीत म्हणुन चौकशी करायला आलो. रूद्र त्यांना सांगतात की महाराजांनी आठ वर्षांपूर्वीच समाधी घेतली आहे. हि महाराजांची लीला ऐकून तो गृहस्थ व रुद्र दोघेही थक्क होतात.

राजाभाऊ अकोलकर त्र्यंबकेश्वरचे यांच्या घरी महाराज राहायचे. यांच्याकडे त्र्यंबकेश्वर मंदिरातील पूजा असल्याने त्यांना बाहेर कुठे तीर्थ यात्रेसाठी जाता येत नसे. यांना महाराजांनी काश्मीर पासून ते कन्याकुमारी पर्यन्त भारत भ्रमण करवून संध्याकाळी सातच्या आरतीला परत त्र्यंबकेश्वर मंदिरात आणले होते.

डॉक्टर धनेश्वर ह्यांना असेच महाराजांच्या वयाबद्दल संदेह होता. त्यांनी महाराजांची परवानगी घेऊन त्यांच्या काही मेडिकल टेस्ट करून घेतल्या. त्या टेस्टचा रिझल्ट आल्यावर डॉक्टराना भोवळ आली. रिझल्ट मध्ये महाराजांचे वय १५२ वर्षे आले.

पुण्याच्या डेक्कन कॉलेज मध्ये असणाऱ्या प्रोफेसर भालचंद्र देवांना महाराजाच्या वया विषयी कुतूहल होते. कारण प्रसंगी ते एका वयोवृद्ध वाटत तर प्रसंगी गब्रू जवाना प्रमाने वागत. एक दिवस धीर करून त्यांनी महाराजांना प्रश्न विचारला “महाराज! आपले वय काय असेल हो?”  महाराज उत्तरले “अंदाजे १५० वर्षे, मी शनिवारवाडयात पेशव्यांबरोबर पंगतीला बसलो आहे” ही घटना साधारण १९३५ ची आहे म्हणजे महारांजानी जेव्हा समाधी (१९४७) घेतली त्या वेळेस ते १६२ वर्षांचे होते.

या सर्व लीला पाहता आपणास समजेल की महाराज म्हणतात माझी अंतरंगातून भक्ती करेल त्यांना मी नक्कीच कळणार, ज्यांना विश्वास, श्रद्धा, प्रेम याची सांगड घालता आली नाही. त्याला कधीच मी समजणार नाही.

श्री शंकर महाराज- एक अनाकलनीय गूढ सत्पुरूष

शंकर महाराज कळण्यासाठी कित्येक जन्म घेतले तरी महाराज काय आहेत कुणाला ही कळणार नाहीत.  योगीराज श्री शंकर महाराज नेहमी म्हणत असत, “पानी पीना छान के और गुरू करना जान के” पाणी जसे गाळून प्यावे. तसेच सद्गुरुची खरी परीक्षा शिष्याने घेऊनच त्याला ओळखावा. आपल्या मतलबासाठी, भक्तांना माळ घालून, नारळ हातात देऊन, त्याच्या कडून पैसा उकळून त्यांना शिष्य करणारे व सर्व रोगांवर उपाय सांगणारे, ढोंगी, नाटक करणारे, खोट्या आशा दाखवणार्‍या गुरूंबद्दल महाराजांना अतोनात चीड होती. आपण गुरूकडे धाव न घेता गुरूच शिष्याच्या शोधात आपल्याकडे येतो. सदगुरू शंकर महाराज म्हणत असत मी आणी माझा गुरु वेगळा नाही. “श्री स्वामी समर्थ” हा माझ्या गुरुचा जप आहे. त्यांचे नाम घेतले की मला ते पोहोचते. जो खुदको जानता है, वो हि मुझे पहचानता है ! हे त्यांचे वचन. महाराज म्हणजे सिगारेट पिणे, चहा पिणे, दारु पिणे, चमत्कार करणे, हे नाही. महाराजांनी काय सांगितले ‘मुझे वो ही जानता है जो खुद को समझता है’ याचा अर्थ काय होतो?

आपण शंकर महाराजांच्या समोर उभे राहुन जर पाहिले तर आपले मन काय म्हणते? विचारा मनाला महाराज सिगारेट दारू चहा पितात का? उत्तर नाही म्हणून येईल. महाराज सांगतात तुम्ही माझे बाह्यवर्तन पाहु नका, आतला शंकर ओळखा. अहो महाराजांना फक्त प्रेम पाहीजे. शंकर महाराज म्हणजे प्रेम फक्त प्रेम. महाराज नापासांची शाळा चालवतात. पहील्या रांगेतील व शेवटच्या रांगेतील सर्वांवर महाराजांचे सारखेच लक्ष असते. महाराजांना वशिला चालत नाही. जो फार पुजा-अर्चा करतो व जो काहीच करित नाही, दोघेही महाराजांना प्रिय. अहो महाराजांना अंतकरणा पासुन हाक मारा, महाराज हजर. महाराज प्रत्येक भक्ताच्या हृदयात विराजमान आहेत हाक मारुन तर पहा.