श्री शंकर महाराजांची तपश्चर्या आणि तीर्थाटन

/श्री शंकर महाराजांची तपश्चर्या आणि तीर्थाटन

श्री शंकर महाराजांची तपश्चर्या आणि तीर्थाटन

 

दावलमलिक पिराचे दर्शन घेऊन बाळ शंकराने नाशिक येथील गोदावरीतीरा वरील श्रीरामाचे दर्शन घेतले. तसेच पुढे जाऊन त्याने सिद्धपीठ त्र्यंबकेश्वर येथील शिवशंकराचे दर्शन घेऊन पुढील तीर्थयात्रेस सुरवात केली. ह्या तीर्थयात्रेत बाळ शंकराने हरिद्वार, ऋषीकेश, देवप्रयाग, रुद्रप्रयाग, बद्रीनाथ, केदारनाथ ह्या तीर्थस्थानांचे दर्शन घेतले. त्या नंतर गुरुआज्ञेनुसार बाळ शंकराने केदारनाथ पासून थोडे दूर वासुकीताल सरोवराजवळील त्रीजुगीनारायण येथील गुहेत अनेक वर्षे तपश्चर्या केली. तदनंतर श्री शंकर महाराजांनी कैलास मानस–सरोवर येथील दर्शन घेऊन थेट प्रयाग येथे पोहोचले. प्रयाग येथील त्रिवेणी संगमात स्नान करून महाराज संपूर्ण भारत भ्रमणास निघाले. ह्या तीर्थाटनात महाराजांनी भारतातील सर्व तीर्थक्षेत्रे, शक्तिपीठे, प्रसिद्ध मंदिरे, ज्योतिर्लिंगे, पवित्र नद्या व घाट यांस भेटी दिल्या. ह्या ठिकाणी महाराज बरीच वर्षे कधी गुप्त तर कधी प्रकट रूपाने आपले अवतार कार्य करीत होते, आणि अशाप्रकारे बाळशंकर, श्री शंकरमहाराज झाले. शेवटी आपल्या अवतारातील उत्तरार्धात ते आपल्या गुरूंच्या दर्शना करिता पौर्णिमेच्या दिवशी अक्कलकोट येथे प्रकटले. श्री स्वामी समर्थांना वंदन करून पुढील अवतार कार्यासाठी आशीर्वाद प्राप्त केला. तेव्हा स्वामी स्मितहास्य करीत उदगरले “जा बाळा, तुला नेमून दिलेले कार्य पूर्णत्वास ने! आम्ही आहोतच तुझ्या पाठीशी!” तदनंतर समाधीस्त होई पर्यंत महाराज स्थूलरूपाने सोलापूर, पुणे, अहमदनगर, मुंबई, इत्यादी ठिकाणी तर सूक्ष्मरूपाने अवघ्या भूतलावर कार्यरत होते.