समाधीमठ

/समाधीमठ

स्वारगेट कडून साताऱ्याकडे जाताना पुणे – सातारा रस्त्याच्या डाव्या बाजूस स्वारगेटपासून सुमारे चार किलोमीटर अंतरावर धनकवडी येथे श्री शंकर महाराजांचा मठ (समाधीस्थान) आहे. तेथे जाण्यासाठी स्वारगेट, शिवाजीनगर व कात्रज येथुन बसची सोय आहे, तसेच कात्रज – स्वारगेट फेऱ्या करणाऱ्या सहा आसनी रिक्षांची सुद्धा सोय आहे.

सुमारे अर्धा एकर जागेत मठ (समाधी मंदिर) आहे. पश्चिम दिशेस सातारा रोड वर मठाचे मुख्य प्रवेशद्वार आहे. प्रवेशद्वारातून आत आल्याबरोबर डाव्या बाजूला चप्पल स्टँड तर उजवे बाजूस हात-पाय धुण्याची सोय आहे. हात व पाय धुवूनच गाभाऱ्यात जाण्याचा रिवाज आहे. समाधी मंदिर दक्षिणोत्तर आहे. मंदिरात जाण्यासाठी उत्तरेकडून दार आहे. दारातून गेल्यावर प्रशस्त सभामंडप असून त्याच्या मध्यभागी मोठे यज्ञकुंड आहे व समोरच गाभाऱ्याचे प्रवेशद्वार दिसते. गाभाऱ्यात श्रींची समाधी व सुरेख संगमरवरी मूर्ती आहे. मूर्तीचे दर्शन सभामंडपाच्या प्रवेशद्वारातूनही होते. मूर्तीच्या मागे चांदीची प्रभावळ आहे. मूर्तीच्या पुढे दक्षिणोत्तर अशी महाराजांची समाधी आहे. गाभाऱ्यामध्ये महाराजांचे निरनिराळ्या पोषाखांमधील फोटो लावलेले आहेत. समाधीच्या उजव्या बाजूस श्री स्वामी समर्थांचा फोटो व पादुका आहेत. तसेच देवळीत श्री गजाननाची मूर्ती आहे, तर डाव्या बाजूस सोलापूरच्या जानुकाकांचा (जनार्दनस्वामी) यांचा फोटो आहे. गाभाऱ्याचे मागील बाजूस ट्रस्ट चे कार्यालय व महाराजांचे शेजघर आहे. शेजघरात महाराजांच्या काही वस्तू संग्रहित केल्या आहेत.

सभामंडपाच्या वरच्या मजल्यावर ध्यान मंदिर आहे. ध्यान मंदिरात श्री अक्कलकोट स्वामी व श्री शंकर महाराजांच्या भव्य तसबिरी आहेत. सामुहिक ग्रंथ पारायण तसेच मठातील इतर धार्मिक कार्यक्रमांसाठी ध्यान मंदिराचा उपयोग होतो.

मंदिराचे बाहेर मारुती, श्री दत्त व अक्कलकोट स्वामी समर्थ यांची छोटी छोटी मंदिरे तसेच विहीर आहे. विहिरीला बाराही महिने पाणी असते. मारुती मंदिर दक्षिणाभिमुख असून आत हनुमंताची रेखीव काळ्या पाषाणात घडविलेली मूर्ती आहे. येथुन श्री शंकर महाराजांच्या मूर्तीचे समोरून दर्शन होते. दत्त मंदिराच्या समोर वडाचा पुरातन वृक्ष आहे. त्याखाली संगमरवरी पादुका आहेत.

सदगुरू श्री शंकर महाराज समाधी मठाविषयी

पुण्यातील स्वारगेट कडून कात्रज कडे जाणाऱ्या पुणे-सातारा रस्त्यावर, स्वारगेट पासून सुमारे ५ किलोमीटर अंतरावर डाव्या हाताला एक मठ लागतो. हाच सदगुरु श्री शंकर महाराजांचा मठ होय, जिथे शंकर महाराजांची पवित्र आणि पावन समाधी आहे. श्री शंकर महाराजांच्या मठात उत्तरेकडील दरवाज्याने आत जाताच आपणास समोर महाराजांचे समाधीमंदीर दिसते. महाराजांचे समाधी मंदीर दक्षिणोत्तर आहे. समाधी मंदिरात प्रवेश करताच आपणास प्रथम प्रशस्त सभामंडप नजरेस पडतो जिथे दर्शना नंतर भक्तगण थोडा वेळ विसावतात. सभामंडपात मध्यभागी यज्ञकुंड आहे. सभामंडपातून पुढे जाताच आपणास दगडी बांधणीचा गाभारा दिसतो. ह्या गाभाऱ्यात श्री शंकर महाराजांची संगमरवरी बांधणीची भव्य समाधी आहे. समाधीच्या उत्तरेस महाराजांच्या पादुका आणि दक्षिणेस उत्तराभिमुख, उकिडव्या अवस्थेत बसलेली, श्री शंकर महाराजांची संगमरवरी मूर्ती आहे.

समाधीस्थानी महाराजांचा बैठकीचा थाट काही आगळाच आहे. उकिडवी बैठक. साहजिकच दोन्ही पाय समपद, तरीही उजवा पाय डाव्या पायापेक्षा किंचित पुढे, दोन्ही गुडघे खंद्या पेक्षाउंच गेलेले. दोन्ही पायांना आजन बाहूंचा सुंदर विळखा. भाळावर चंदनाचा टिळा, डोक्यावर भारदार फेटा, भरजरी वस्त्रे आणि पाठीवर रेशमी शाल. तेजस्वी डोळे, धारधार नाक, पिळदार मिश्या आणि भारदस्त दाढी. गळ्यात सोन्यात मढवलेली रुद्राक्षांची माळ आणि फुलांचे हार. बेल, तुळस आणि सुगंधी पुष्पांनी सजवलेली समाधी. समाधी मागे सोन्या चांदीने मढवलेली प्रभावळ आणि माथ्यावर सुशोभित छत्र. एकंदरीतच समाधीचे दर्शन इतकं प्रसन्न आणि मनोवेधक की पाहणारयाचे देहभान हरवून जाव…

गाभाऱ्या मध्ये उजव्या हाताला देवळीत श्री गणेशाची मूर्ती विराजमान आहे. तसेच उजव्या बाजूस श्री स्वामी समर्थांची तसबीर व पादुका तर डाव्या बाजूस श्री जनार्दन बुवांची तसबीर व पादुका आहेत. गाभाऱ्या मध्ये श्री शंकर महाराजांच्या विविध भाव मुद्रेतील तसबिरी लावल्या आहेत. गाभाऱ्याच्या डाव्या बाजूस महाराजांचे शेजघर आहे. शेजघरात महाराजांचा पलंग व त्यांच्या वापरातील काही वस्तू संग्रहित केल्या आहेत. शेजघरात श्री सदगुरु चिले महाराजांची तसबीर लावली आहे. तसेच इथे महाराजांच्या पालखीतील तसबिरी व मठातील देवांची पूजा करण्यात येते. गाभाऱ्याच्या मागील बाजूस महाराजांचे स्वयंपाक घर आणि मठाचे कार्यालय आहे.

मठाच्या आवारात औदुंबर, वड, पिंपळ, बेल, चंदन ह्या सारखे पवित्र वृक्ष आहेत. समाधी मंदिराच्या समोर दक्षिणमुखी श्री हनुमानाचे मंदिर आहे. श्री हनुमानाच्या मंदिरा मागे श्री दत्तात्रयांचे मंदीर आहे. श्री दत्तगुरूंच्या मंदीरात नवनाथांची तसबीर आहे. श्री दत्त मंदीरा समोर वडाचे झाड आहे. त्याच्या पायथ्याशी संगमरवरी पादुका आहेत. ह्याच वृक्षाखाली पुरातन विहीर असून, जी महाराजांच्या कृपे मुळे सदैव कठोकाठ भरलेली असते. मठाच्या आवारात श्री स्वामी समर्थांचे मंदीर आहे.