Skip to main content Skip to search

सदगुरू श्री. शंकर महाराज यांचे अल्प चरित्र

आपल्या भारतवर्षाचे भाग्य थोर म्हणून या सिद्ध भूमीत आजवर अनेक ईश्वरतुल्य संत, सत्पुरुषांनी जन्म घेतला. त्याच परंपरेतील श्री शंकर महाराज हे एक सिद्ध आणि अवलिया पुरुष होते.

अवधूत ह्या शब्दाची व्याख्या विचारात घेतली तर आपणास मनोमन पटते कि श्री शंकर महाराज एक अवधूत होते. अशा अवधुतांच्या तीन अवस्था सांगितल्या आहेत. बाल अवस्था, उन्मनी अवस्था आणि पिशाच्च अवस्था. ह्या तीनही अवस्था स्वीकारणारे व जगणारे महान योगीराज म्हणजे सदगुरु श्री शंकर महाराज. मैं कैलास का रहनेवाला I मेरा नाम है शंकर II ह्या उक्तीतून स्वतः श्री शंकर महाराजांनी आपले मूळ स्थान व नाव आपणास सांगितले आहे. श्री शंकर महाराज नाथपंथीय होते, अवतार कार्यात ह्याची प्रचीती त्यांनी आपल्या भक्तांस पदोपदी दिली होती.

 

श्री शंकर महाराज……! एक अलौकिक, सिद्ध, महान योगी. त्यांचे व्यक्तिमत्वही गूढ, अनाकलनीय. त्यामुळे त्यांच्यासंबंधी विविधरंगी आख्यायिका ऐकावयास मिळतात. श्री शंकर महाराज यांचा जन्म कधी व कोठे झाला? त्यांचे गाव कोठले? मातापिता कोण? इत्यादी पुर्ववृताची विश्वसनीय व सुसंगत माहिती उपलब्ध नाही. अर्थात, सत्पुरुषांचे कार्य महान आणि अतिउच्च स्तरावरून चालत असल्याने या लौकिक व व्यावहारिक गोष्टींना फारसे महत्व नाही. संतपुरुष जनकल्याणा साठी प्रकट होतात आणि जनकल्याणा साठी सारे आयुष्य वेचतात. सिद्धपुरुषांच्या ठिकाणी अनेक ऋद्धीसिद्धी असल्याकारणे त्यांची जगावर पूर्ण सत्ता असते. आपले अवतार कार्य संपताच तेही निसर्ग नियमानुसार आपला देह विसर्जन करतात. परंतु त्या नंतरही त्यांचे लोकोद्धाराचे कार्य सुरूच असते.