अल्प चरित्र

Home / अल्प चरित्र

ll श्री सद्गुरूंचा परीचय ll

श्री शंकर महाराज हे एक सिद्ध आणि अवलिया पुरुष इ.स. अठराशे मध्ये प्रकट झाले. श्री सद्गुरू शंकर महाराज कोठे जन्मले ? त्यांचे वय काय ? त्यांचे आई – वडील कोण ? त्यांचे गुरु कोण ? या गोष्टींबाबत पुरेशी माहिती उपलब्ध नाही. त्यांच्या खऱ्या वयाचा अंदाज शेवटपर्यंत कोणालाच आला नाही. त्यांचे भक्तगण त्यांना साक्षात शंकराचाच अवतार मानतात. त्यांनी वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या प्रांतात भक्तोदधार केला. कुठे सुपड्याबाबा तर कोठे कुंवरस्वामी, कोठे रहिमबाबा तर कोठे जॉन साहेब “अवतरे मी युगी युगी”  या भगवत वाक्याच्या आधारे श्रींनी कार्य केले.
देहयष्टीने शंकर महाराज आठ ठिकाणी वाकडे असे “ अष्टवक्र ” होते. त्यांचा वर्ण सवल असून डोळे टपोरे आणि हिऱ्यासारखे तेजस्वी होते. दाढी मिशा आणि डोक्यावरचे केस बहुधा अस्तव्यस्त पसरलेले असत. त्यांच्या मुखावरील हास्य बालकाप्रमाणे निरागस व बोलणे बोबडे असे. कधी भरजरी फेटा, आंगठ्या, कंठा तर कधी दिगंबर अवस्था ! असे महाराजांचे स्वरूप असे. न कळवता यावं व न सांगता जावं हा महाराजांचा परिपाठ असे. चहा, मुगाची खिचडी, सिगारेट या गोष्टींवर त्यांचे विशेष प्रेम असे. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांना ते गुरु मानत.
महाराजांचा भक्तसमुदाय संपूर्ण जगात विखुरलेला आहे.
श्री शंकर महाराज हे एक सिद्ध आणि अवलिया पुरुष इ.स. अठराशे मध्ये प्रकट झाले. श्री सद्गुरू शंकर महाराज कोठे जन्मले ? त्यांचे वय काय ? त्यांचे आई – वडील कोण ? त्यांचे गुरु कोण ? या गोष्टींबाबत पुरेशी माहिती उपलब्ध नाही. त्यांच्या खऱ्या वयाचा अंदाज शेवटपर्यंत कोणालाच आला नाही. त्यांचे भक्तगण त्यांना साक्षात शंकराचाच अवतार मानतात. त्यांनी वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या प्रांतात भक्तोदधार केला. कुठे सुपड्याबाबा तर कोठे कुंवरस्वामी, कोठे रहिमबाबा तर कोठे जॉन साहेब “अवतरे मी युगी युगी”  या भगवत वाक्याच्या आधारे श्रींनी कार्य केले.
देहयष्टीने शंकर महाराज आठ ठिकाणी वाकडे असे “ अष्टवक्र ” होते. त्यांचा वर्ण सवल असून डोळे टपोरे आणि हिऱ्यासारखे तेजस्वी होते. दाढी मिशा आणि डोक्यावरचे केस बहुधा अस्तव्यस्त पसरलेले असत. त्यांच्या मुखावरील हास्य बालकाप्रमाणे निरागस व बोलणे बोबडे असे. कधी भरजरी फेटा, आंगठ्या, कंठा तर कधी दिगंबर अवस्था ! असे महाराजांचे स्वरूप असे. न कळवता यावं व न सांगता जावं हा महाराजांचा परिपाठ असे. चहा, मुगाची खिचडी, सिगारेट या गोष्टींवर त्यांचे विशेष प्रेम असे. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांना ते गुरु मानत.
महाराजांचा भक्तसमुदाय संपूर्ण जगात विखुरलेला आहे.
श्रींनी वैशाख शु. ll अष्टमी शके १८६९ (सन १९४७) सोमवार या दिवशी लौकिक देह ठेवला. पुणे–सातारा रोड जवळ धनकवडी येथे श्रींची समाधी आहे. सृष्टीच्या नियमाप्रमाणे श्री शंकर महाराज देहाने जरी गेले तरी त्यांचे अस्तित्व व्यापक स्वरुपात अजूनही अनुभवास येते. धावा करताच आपल्या भक्तांसाठी ते धावून येतात; परंतु एकच श्रद्धा निष्ठा आणि भक्ती दृढ पाहिजे.

ll अनंत कोटी ब्रम्हांड नायक राजाधिराज योगीराज श्री सद्गुरू शंकरबाबा महाराज कि जय ll

श्री सदगुरू शंकर महाराज यांचे अल्प चरित्र

आपल्या भारतवर्षाचे भाग्य थोर म्हणून या सिद्ध भूमीत आजवर अनेक ईश्वरतुल्य संत, सत्पुरुषांनी जन्म घेतला. त्याच परंपरेतील श्री सद्गुरू शंकर महाराज हे एक सिद्ध आणि अवलिया सत्पुरुष होते.
 
अवधूत ह्या शब्दाची व्याख्या विचारात घेतली तर आपणास मनोमन पटते कि श्री शंकर महाराज अवधूतच होते. अशा अवधुतांच्या तीन अवस्था सांगितल्या आहेत. बाल अवस्था, उन्मनी अवस्था आणि पिशाच्च अवस्था. ह्या तीनही अवस्थांमध्ये आपल अवतारकार्य संपन्न करणारे असे योगीराज म्हणजे सदगुरु श्री सद्गुरू शंकर महाराज. मैं कैलास का रहनेवाला I मेरा नाम है शंकर II असे त्यांनी स्व:मुखे आपल्या मूळस्थान व नाव आपल्याला सांगितले आहे. श्री शंकर महाराज नाथपंथीय होते, अवतार कार्यात ह्याची प्रचीती त्यांनी आपल्या भक्तांस पदोपदी दिली होती.
 
श्री शंकर महाराज……! एक अलौकिक, सिद्ध, महान योगी. त्यांचे व्यक्तिमत्वही गूढ, अनाकलनीय. त्यामुळे त्यांच्यासंबंधी विविधरंगी आख्यायिका ऐकावयास मिळतात. श्री शंकर महाराज यांचा जन्म कधी व कोठे झाला? त्यांचे गाव कोठले? माता-पिता कोण? इत्यादी पुर्ववृताची विश्वसनीय व सुसंगत माहिती उपलब्ध नाही.

श्री शंकर महाराजांच्या जन्माविषयी

वर सांगितल्या प्रमाणे श्री शंकर महाराजांच्या जन्माविषयी माहिती ज्ञात नाही. त्यांच्या भक्तांकरवी जी माहिती मिळाली ती अशी:- दैवीस्वप्नदृष्टांतानुसार श्री शंकर महाराज, अंतापूर जिल्हा  नाशिक, तालुका सटाणा येथील शिवभक्त दाम्पत्य श्री चिमणाजी व सौ पार्वती ह्यांना दावलमलिक पिराजवळील दाट जंगलात (अयोनिज) बालक अवस्थेत सापडले.
भगवान शंकरांच्या कृपाप्रसादाने पुत्ररत्न प्राप्त झाल्या कारणे ह्या दत्तक आई-वडिलांनी बाळाचे नाव “शंकर” ठेवले. श्री चिमणाजी व सौ पार्वती ह्यांनी बाळ शंकराचे अगदी मायेने संगोपन केले. कोडकौतुक पुरवले. बाळ शंकर लहानपणापासूनच ध्यानात मग्न राहणारा, नामस्मरणात दंग होणारा, कीर्तन भजनात रमणारा शिवभक्त होता. पुढे त्यांनी ईश्वरी इच्छेनुसार अवतार कार्य पूर्ण करण्या करीता आई-वडिलांचा निरोप घेऊन अंतापूर सोडले.

श्री शंकर महाराजांचे रुपवर्णन

श्री शंकर महाराज अष्टवक्र होते. त्यांचा वर्ण सावळा असून उंची बेताची होती. डोळे टपोरे आणि हिऱ्या सारखे तेजस्वी होते. दाढी, मिशा, डोक्यावरील केस नेहमीच अस्ताव्यस्त असत. महाराज बऱ्याचदा उन्मनी किंवा बालभावत असत. त्यांच्या चेहऱ्यावरील हास्य बालाकाप्रमाणेच निरागस आणि बोल बोबडे होते. ते अजानबाहू म्हणजेच, त्यांचे हात गुडघ्या पर्यंत पोहचत. महाराज कधी धोतर-कुर्ता तर कधी सलवार-कुर्ता घालत. कधी सुटा-बुटात तर कधी एखाद्या राजा प्रमाणे भरजरी वस्त्रे परिधान करीत. कधी रेशमी पितांबर तर कधी दिगंबर अवस्थेत असत. ते हाताच्या बोटात अंगठ्या घालत. श्री शंकर महाराजांचे निस्सीम भक्त, श्री.सरदार नानासाहेब मिरीकरांनी महाराजांचे रूपवर्णन खालील अभंगातून केले आहे:

वेश घेतला बावळा, अंतरी शुद्ध ज्ञानकळा I

ऐसा सदगुरू लाघवी, नाना रंगी जन खेळवी I      

बाल पिशाच्च उन्मत्त, लीला दावी तो विचित्र I

लुळा पांगळा जडमूढ, सांगेना अंतरीचे गूढ I

शंकरदासाचे लक्षण, तेथे राहे नारायण II

श्री शंकर महाराजांची प्रांतानुसार निरनिराळी नावे

महाराजांचे अध्यात्म प्रसाराचे कार्य अखंड चालू होते. अवतार कार्यात महाराजांची देश-विदेश भ्रमंती सतत चालू असे. त्यांची ज्यांच्यावर कृपा झाली, त्या भक्तांनी महाराजांना, ज्या नावाने संबोधिले ती नावे प्रांतोप्रांती वेगवेगळी आढळतात.
महाराष्ट्रात – श्री.शंकरमहाराज, मध्यप्रदेशात -गौरीशंकर, खानदेशात – कुवंरस्वामी समर्थ, गुजरातमध्ये – देवियाबाबा, मद्रासमध्ये – गुरुदेव, सातपुडा भागात – सुपाड्याबाबा, युरोपात – जॉनसाहेब, यवन देशात – राहीमबाबा, आफ्रिकेत – टोबो, अरबस्तानात नूर मोहम्मदखान.

श्री शंकर महाराज यांचा उपदेश

श्री शंकर महाराज नेहमी उपदेश करीत कि सतत स्वामी नामस्मरण करा, स्वामी नामाला कदापि अंतर देऊ नका. माझे सदगुरू अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ यांचे स्मरण केलेत की मी तृप्त व प्रसन्न झालो म्हणून समजा. परमेश्वर प्राप्तीसाठी प्रेममय भक्तीचे रहस्य भक्तांना उलगडून सांगितले. श्री शंकर महाराज म्हणतात “देवाला प्रसन्न करून घेण्या पेक्षा तुमच्यातील देवत्व प्रकट करा. तुमच्यातील काम, क्रोध, लोभ, मोह, मद व मत्सर यांना तिलांजली दिलीत की तुमच्यातील देवत्व प्रकट होईल. देव बाहेर शोधण्याचा प्रयत्न करण्यापेक्षा अंतर्मुख व्हा. आपल्यातील दुर्गुण ओळखून ते दूर करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करा. म्हणजे आतूनच देवत्वाच्या प्रभा बाहेर पसरू लागतील.” महाराज नेहमीच सांगत “बाबांनो, आपल्या मनाचे आणि अंत:करणाचे निरीक्षण करा. आपल्या सुखाच्या आड काय येते त्याचा शोध घेऊन त्या गोष्टींचा त्याग करा.” तुम्ही जेव्हा अत्माबोधावर याल तेव्हाच तुम्हाला आत्मसाक्षात्कार घडेल. आत्मबोधानेच आत्मसाक्षात्कार घडतो यावर श्रद्धा ठेवा. घरी आई वडिलांची मनोभावे सेवा करा. ती सेवा तुम्हाला जीवनातील अनेक दु:खातून तारेल आणि दिव्यत्वाची वाट दाखवील. त्या वाटेवरून आपण चाललो तर नक्कीच शाश्वत आनंदाची प्राप्ती होईल.

श्री शंकर महाराजांचा समाधी दिन

सन १९४६ च्या उत्तरार्धात महाराजांनी, समाधीस्त होण्याचा मनोदय आपल्या भक्तांजवळ व्यक्त केला. ते म्हणाले शके १८६९, वैशाख शुद्ध अष्टमीला जीवनमुक्तांना समाधी घेण्यासाठी अत्यंत शुभयोग आला आहे. त्या दिवशी आम्ही समाधी घेणार आहोत. महाराज आपल्या निवडक भक्तांसमवेत पद्मावती जवळील मालपाणींच्या शेतात गेले व तेथील एक जागा समाधी करिता सुनिश्चित केली. त्याच प्रमाणे अन्त्ययात्रेचा मार्ग हि आखून दिला. शेवटच्या काही महिन्यात महाराजांनी आपल्या प्रिय शिष्यांच्या भेटी घेऊन आपले अवतार कार्य संपविण्याविषयी अवगत केले. शके १८६९ चा चैत्र मास संपून वैशाख मास प्रारंभ झाला. शेवटच्या आठवड्यात महाराजांनी मौन व्रत स्वीकारलं. फक्त कामापुरतच बोलत. ह्याच दिवसात श्री मामा ढेकणे यांच्या घरी महाराजांनी स्वहस्ते खिचडी बनवून आपल्या भक्तांस शेवटचा प्रसाद दिला. वैशाख शुद्ध सप्तमीस महाराज शुचिर्भूत होऊन, स्वामी समर्थांना नमन करून, श्री मामा ढेकणे यांच्या घरातील फडताळात जाऊन आसनस्थ झाले. दुसऱ्या दिवशी पहाटे म्हणजेच शके १८६९, वैशाख शुद्ध अष्टमीस, सोमवार, दि. २८ एप्रिल, १९४७ फडताळातून अवतार समाप्तीचा संदेश आला. “पुढील सोय करा. ह्या पार्थिवास सांभाळा… हि ज्ञानदेवीची ज्योत अनंतात विलीन होत आहे.”
 
त्याच दिवशी श्री मामा ढेकणे यांच्या घरापासून टाळमृदुंगाच्या गजरात, भजन म्हणत, खांद्यावर पताका घेऊन महायात्रा निघाली. महाराजांनी आखून दिलेल्या मर्गाने महायात्रा समाधी स्थळी पोहोचली. सायंकाळच्या सुमारास टाळमृदुंगाच्या गजरात, “अनंत कोटी ब्रम्हांड नायक सदगुरू श्री शंकर महाराज की जय” या जयघोषात आणि महाराजांनी सांगितलेल्या प्रक्रीयेनुसार महाराजांचे पार्थिव समाधीस्त करण्यात आले.
 
अशाप्रकारे कार्तिक शुद्ध अष्टमीला प्रकट झालेली पार्थिवाच्या पणतीमधील चैतन्याची ज्योत वैशाख शुद्ध अष्टमीला चैतन्यस्वरुपात विलीन झाली. चराचरात सामावली.   
 
“आत्मकलेपैकी एक कला, जनकल्याणासाठी समाधी स्थानात सदैव राहील.
“माउलीचा आशिर्वाद  ‘ जो जो वांछील, तो ते लाहो – प्राणिजात.’
 
सदगुरू श्री शंकर महाराजांना खऱ्या अर्थानं फार कमी लोकांनी ओळखले. ज्यांनी त्यांचे अंतरंग जाणले ते त्यांचे अंतरंग शिष्य झाले. ज्यांनी त्यांना वरवर पहिले ते त्यांचे निंदक झाले. कुणी त्यांना ‘शाक्त’ म्हणत तर कुणी त्यांना साक्षात ‘शंकर’ म्हणत. कुणी त्यांना अवधूत अवलिया मानत तर कुणी त्यांना ठार वेडा मानत. कुणी ‘सिद्ध’  समजत तर कुणी ‘भ्रमिष्ट’ समजत. कुणी ‘व्यसनी’ समजून हेटाळणी करी तर कुणी ‘ज्ञानी’ समजून पाय धरी. पण वास्तवात श्री शंकरमहाराज द्वैताच्या पलीकडले होते. ज्या भक्तांनी आपला ‘ आत्मरूप शंकर ‘ जाणला त्यानांच हा ‘ परमात्मा शंकर ’ कळला….