दुर्गाष्टमी

Home / दुर्गाष्टमी

!! नामजप !!

शुद्ध प्रतिपदा ते सप्तमी असा दुर्गाष्टमीपूर्वी दरमहा नामजप सप्ताह होतो. “महाराज श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ” असा संध्याकाळी ७.१५ ते ८.१५ एक तास जप केला जातो. जप सुरु करण्यापूर्वी गाभाऱ्यात विश्वस्त अथवा गुरुजींकडून वीणा पूजन केले जाते. कालनिर्णय प्रमाणे अमावस्या संपून सूर्योदयाची तिथी धरली जाते. 
सप्ताहात जपाची सेवा एक तासाची बैठक व मोठा आवाज असणाऱ्या इच्छुक सेवेकऱ्यांस दिला जातो. तसेच त्यालाच दुर्गाष्टमी दिवशी वीणा घेण्याचा मानही दिला जातो.

!! पालखी सोहळा !!

दुर्गाष्टमी ला पहाटे श्रींचे मंगल स्नान व अभिषेक संपन्न होते. त्रिकाळ आरती नैवेद्य होतो. दुपारी ०१ वाजण्याच्या सुमारास पालखीची तयारी सुरु होते. दुपारी श्रींचा गाभारा स्वच्छ  आवरून साधारणपणे दुपारी ०२ ते ०३:३० या वेळी गाभाऱ्यात पुजा मांडली जाते. पालखीत ठेवण्यासाठीच्या श्रींच्या पादुकांची व शेजघरातील श्रींच्याफोटोंची पूजा केली जाते. पालखीचे यजमान व गुरुजींच्या हस्ते रुद्राभिषेक पूजा संपन्न होते. त्याच बरोबर नित्याचे कर्मचारी, सेवेकरी समाधी वरील फुलांची आरास, स्वच्छता व इतर तयारी करत असतात.
 
धूप दाखवून पालखी सोहळा दुपारी ०४:०० वाजता शंख नादाने सुरु होतो. सर्व भजनकरी सभामंडपात एकत्र जमतात. समाधी वर वीणा ठेऊन तिचे पूजन करून, विणॆकरेच्या गळ्यात दिली जाते. तदनंतर “जय जय राम कृष्ण हरी” हे पद म्हंटले की समाधीचे दर्शन एका बाजूने सुरु करण्यात येते. रूप पाहता लोचनी, शंकरबाबा हात जोडितों, ऐसा येई बा आणि इतर दोन भजनं होऊन “गुरु महाराज गुरु” हा जप घेतला जातो. त्यांवेळी पूजेतील फोटो, पादुका समाधीच्या पादुकांना लाऊन यजमानांच्या हस्ते पालखीत ठेवल्या जातात. गाभाऱ्यातील त्रिशूळ सेवेकऱ्याकडे दिले जाते तसेच दोन अब्दागिऱ्या व पालखीवर धरण्यासाठीची छत्री सेवेकऱ्यांच्या हातात दिली जाते. अखंड कापूर तेवत ठेवलेला एक दिवा पालखी सोबत असतो. तसेच पालखीत देखील एक तुपाचा दिवा तेवत असतो. नंतर यजमानांच्या सौंच्या हस्ते श्रीनां पालखीत औक्षण केले जाते, हरिपाठ संपन्न होऊन पालखी प्रदक्षिणे साठी मार्गस्थ होते
 
कापराचा दिवा सगळ्यात पुढे, त्याच्या मागे भजनी मंडळ नंतर विणेकरी, त्रिशूळ व अब्दागीरी धारक, त्यानंतर पालखी व छत्री आणि सर्वात शेवटी महिला भक्त असा क्रम असतो. पालखी स्वामी मंदिरा जवळ थांबते तिथे “त्रिमूर्ती वसे” हे अष्टक संपन्न होतं, स्वामी महाराजांचं एक भजन होऊन पालखी दत्त मंदिराकडे मार्गस्थं होते. पुढे पालखी विहिरी पाशी आली कि मारुतीरायाला एक नारळ फोडला जातो व पहिली प्रदक्षिणा करून पालखी सभामंडपात येते.
 
तदनंतर दोन प्रदक्षिणा गाभाऱ्या भोवती होऊन मग पालखी पुन्हा सभामंडपात येते. संध्याकाळी ६.४० वाजता धन्य धन्य प्रदक्षिणा व पुष्पांजली चे भजन होते. पालखीचे भोई यांचे यजमान पाद्यपूजन करतात व पुन्हा श्रीनां औक्षण करून पालखी सोहळा विसावतो. पालखी उचलताना व ठेवताना पालखी खाली कापूर लावला जातो.
पादुका व फोटो गाभाऱ्यात नेऊन आरती होते. आरती नंतर विणेकरी, त्रिशुलधारी व यजमान यांना श्रीफळ प्रसाद दिला जातो.
 
अशाप्रकारे दर महिन्याच्या शुद्ध अष्टमीला म्हणजेच “दुर्गाष्टमी” दिवशी मठात श्रींचा पालखी सोहळा संपन्न होत असतो.
 
दत्त जयंती व गुरुपौर्णिमेला देखील याच पद्धतीने पालखी सोहळा संपन्न होतो. दत्तजयंती दिवशी पंचांग पाहून चंद्रोदयाच्या वेळी पालखीत गुलाल वाहून दत्त जन्म साजरा केला जातो.
 
दुर्गाष्टमीला पालखीत पादुका व शिवलिंग असते. गुरुपौर्णिमा व दत्तजयंती ला पालखीत छोटी पितळी दत्तमूर्ती ठेवली जाते. वैशाख शुद्ध अष्टमी, दत्त जयंती व गुरुपौर्णिमेला पालखी समोर राजदंड उभारला जातो व चवऱ्या ढाळल्या जातात.
 
दुर्गाष्टमी,  महाअष्टमी व दत्तजयंती पालखीची वेळ दुपारी ०४:०० ते सायं : ०६:४०
गुरुपौर्णिमा पालखीची वेळ सकाळी १०:०० ते दुपारी १२:४० ग्रहणकाळात जर पालखी सोहळा आला तर वेळा त्या अनुषंगाने बदलल्या जातात. चैत्र ते फाल्गुन अशा १२ महिन्याच्या १२ अष्टमी व दत्त जयंती आणि गुरुपौर्णिमा असे एकूण १४ पालखी सोहळे संपन्न होतात. श्रींची पालखी मठाबाहेर नेली जात नाही.
 
सद्गुरू शंकरमहाराजांच्या पादुका पुजन व पालखी सोहळा मठाच्या आवारातच ट्रस्टतर्फे साजरा केला जातो.