वैशाख शुद्ध प्रतिपदा ते वैशाख शुद्ध नवमी पर्यंत श्रींचा समाधी सोहळा संपन्न होतो.
महाराजांचा समाधी सोहळा दरवर्षी अधिक दिमाखदार व वैभवशाली करण्याचा विश्वस्तांचा प्रयत्न असतो. उत्सव काळात मठ संपूर्ण २४ तास श्रींच्या दर्शनाकरिता खुला असतो. श्रींच्या समाधी उत्सवा आधीची कामे “उत्सवातील कामे” या लिस्ट प्रमाणे सेवेकरी व विश्वस्तां मार्फत केली जातात तसेच गाभारा, सभामंडप व इतर इमारतींना रंग रंगोटी केली जाते. फुलांची सजावट व रोषणाई केली जाते. श्रींच्या समाधी उत्सवात भक्तीसंगीत महोत्सव तसेच विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येते. श्रींच्या समाधी उत्सवात ७ दिवस संध्याकाळी आरती नंतर वेगवेगळ्या प्रकारचे प्रसाद ट्रस्ट व सेवेकऱ्यांमार्फत भक्तांना दिले जातात.
वैशाख शुद्ध प्रतिपदा
या दिवशी पहाटे ०४ वाजता श्रींचे मंगलस्नानास आरंभ होतो. श्रींचा पोशाख व नैवेद्या नंतर कलश पूजन व वीणा पूजन करून उत्सवास प्रारंभ होतो. सूर्योदयापासून अखंड सप्ताह वीणा उभी केली जाते व “गुरू महाराज गुरु जय जय परब्रम्ह सद्गुरू” असा जप केला जातो.
वैशाख शुद्ध ०३ अक्षय तृतीया
या दिवशी सकाळी सर्व उपचार संपन्न होऊन गजानन विजय ग्रंथाचे पारायण संपन्न होते व पिठले भाकरीचा नैवेद्य व प्रसाद सर्व भक्तांना देण्यात येतो. श्री शिवाजी महाराज विडणी यांच्या पुण्यतिथी निमित्त ११ लहान मुलांना भजी व दक्षिणा दिली जाते.
सायंकाळी आरती नंतर अन्नपूर्णा पुजा संपन्न होऊन, महाप्रसादाच्या बुंदीचा पहिला घाणा काढून अन्नपूर्णा व बुंदीची पूजा केली जाते. या दिवसा पासून प्रसादाची बुंदी तयार करण्यास सुरूवात होते व हि बुंदी प्रसाद म्हणून वैशाख शुद्ध अष्टमीला दिवसभर महाप्रसादासाठी व संध्याकाळी पालखी नंतर वाटली जाते.
वैशाख शुद्ध अष्टमी (महाष्टमी)
पहाटे २ च्या सुमारास श्रींच्या अभिषेकास प्रारंभ होतो व सर्व पूजा विधी झाल्यावर नवीन आसूड (चाबूक) व समाधी वरील छडी ची पूजा करण्यात येते. आसूड शेजघरामध्ये ठेऊन व छडी समाधीवर ठेऊन हि पूजा संपन्न होऊन पहाटे ५:०० वा महारती होते.
आरती नंतर महारुद्राभिषेक श्रींच्या पालखीतील पादुकांवर केला जातो. महाराजांना पुरणपोळी व विविध प्रकारची मिठाई यांचा नैवेद्य दाखवला जातो. त्यांनतर आरती, ब्राम्हण भोजन व महाप्रसाद सुरु केले जाते. सर्व ब्रम्हवृंदाना दक्षिणा व बुंदीचा प्रसाद देण्यात येतो. दुपारी ०४ ते ०६:४० पालखी सोहळा संपन्न होतो. ०६.४५ वाजता आरती होऊन रात्री १०:०० ते ११.३० पर्यंत देवीच्या गोंधळाचा कार्यक्रम हॊतॊ. त्यानंतर पहाटे पर्यंत भजन सेवा संपन्न होते.
वैशाख शु ०९ सप्ताह समाप्ती काला :
या दिवशी श्रींना अभिषेका पूर्वी सुगंधी तेलाचे लेपन केले जाते. तदनंतर श्रींना गरम पाण्याने अभिषेक केला जातो. या दिवशी श्रींच्या अभिषेका मध्ये दुधाचा अभिषेक केला जात नाही. तसेच पोशाखा नंतर श्रीनां चहा ऐवजी केशर दुधाचा नैवेद्य अर्पण केला जातो व सकाळची आरती संपन्न होते.
ध्वजारोहण सोहळा (नवीन ध्वज) सकाळी १०.३० ते ११.३० या दरम्यान संपन्न केला जातो.
मुख्य ध्वजस्तंभ, गाभारा, स्वामी मंदिर, मारुती मंदिर व दत्त मंदिर वरील ध्वज बदलले जातात. ९:०० ते १२:०० या वेळेत काल्याच्या कीर्तनाचा कार्यक्रम ह.भ.प. लेंभे शास्त्री (पिंपोंडे बु., कोरेगाव, सातारा) यांच्या तर्फे गुरूपरंपरागत रितीने होतो व कीर्तनानंतर हंडी फोडली जाते. दुपारच्या आरती नंतर काल्याच्या कीर्तनाचा प्रसाद व महाप्रसाद वाटप केले जाते. ध्वज उचलल्या नंतर थोड्याच वेळात भाविकांसाठी दर्शन बंद करून सभामंडपातून दुपारची आरती केली जाते.
आरती नंतर श्रींची प्रक्षाळ पुजा (देवाला विश्रांती व शीण घालवणे यासाठीची पूजा) होऊन श्रीना चहा सिगारेट चा नैवेद्य दाखवून गाभारा बंद केला जातो संपूर्ण परिसर धुवून झाल्यावर साधारण ४:०० ते ५:०० या वेळात शांतीपाठ केला जातो व त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी ०४:३० पर्यंत मठ बंद राहतो. सर्व सेवेकऱ्यांना श्रीफळ व बुंदीच्या प्रसादाचे वाटप केले जाते.
वैशाख शुद्ध द्वादशीला अखिल भारतीय वारकरी मंडळा मार्फत चंदन उटीची भजनं करण्यात येतात. श्रींना व पादुकांना त्यादिवशी चंदन उटी लेप लावण्यात येतो व त्यानंतर महाप्रसाद वाटण्यात येतो.