समाधी उत्सव
Home / समाधी उत्सव
वार्षिक उत्सव – सदगुरु श्री शंकर महाराज समाधी सोहळ्या विषयी:
दर वर्षी वैशाख शुद्ध प्रतिपदा ते वैशाख शुद्ध नवमी सदगुरु श्री शंकर महाराजांचा समाधी सोहळा साजरा करण्यात येतो. वैशाख शुद्ध प्रतिपदेस पहाटे चार वाजता, चौघड्याच्या निनादात, काकड आरतीने श्रीं च्या अभिषेकाने उत्सवास सुरवात होते. त्या नंतर वीणा पूजन करून अखंड नाम सप्ताहास सुरवात होते. समाधी उत्सवात रोज काकड आरती, लघुरुद्र, प्रवचन, कीर्तन, भजन, पारायण इ. अध्यात्मिक व धार्मिक कार्यक्रम करण्यात येतात. उत्सव काळात श्रीं चा मठ व दर्शन रात्रंदिवस अखंड चालू असते. अक्षय तृतीयेच्या दिवशी श्री अन्नपूर्णेचे पूजन करून उत्सवातील महाप्रसाद (बुंदी/कळी) तयार करण्यास सुरवात होते. महाराजांच्या समाधी दिनी म्हणजेच वैशाख शुद्ध अष्टमीस पहाटे २.३० वाजता श्रीं च्या अभिषेकास सुरवात होते. श्रीं ची आरती पहाटे ५.३० वाजता होऊन, महारुद्रास सुरवात होते. महारुद्र संपन्न झाल्यावर महाप्रसादास सुरवात होते जो रात्री उशीर पर्यंत चालू असतो. सायंकाळी ४ वाजता श्रीं चा पालखी सोहळा सुरु होतो व सायंकाळी ७.३० वाजता महाआरती संपन्न होते. त्या नंतर मठात श्री भवानीआईच्या जागरण गोंधळास सुरवात होते. अष्टमीच्या दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजता प्रक्षावळ पूजा, ध्वजारोहणानंतर काल्याच्या कीर्तनांस सुरवात होते. काल्याचे कीर्तना नंतर महाप्रसाद देण्यात येतो. हे सर्व कार्यक्रम संपन्न झाल्यावर उत्सवाची सांगता होते.
