श्री सदगुरू शंकर महाराज

स्थानमाहात्म्य

मुक्काम पुणे. सन १९४६ मध्ये घडलेली घटना. श्री शंकर महाराज यांनी काही निवडक भक्तांना आपल्यासोबत घेतले आणि ते पुणे शहराबाहेर देवी पद्मावतीच्या मंदिरामध्ये आले. सर्वांनी पद्मावतीचे दर्शन घेतले. श्री महाराज तिथे काही काळ थांबले. ते काही काळ थांबून माघारी परततील असा भक्तांचा समज झाला मात्र श्री महाराज मंदिरातून बाहेर येण्याचे नाव काढेनात. बऱ्याच वेळाने अचानक ते उठले, बाहेर आले आणि झपाझप पावले टाकत सातारा रस्त्याच्या दिशेने लागले. बऱ्याच वेळाने ते एका शेतापाशी थांबले व म्हणाले, “ही जागा गावापासून दूर आहे. पद्मावतीमातेच्या निकट आहे. समाधी घेण्यासाठी हे योग्य स्थान आहे तेव्हा मी येथेच समाधी घेणार !’ श्री महाराजांचे हे शब्द कानी येताच तिथे उपस्थित असलेल्या भक्तांच्या पायाखालची जमीन सरकली. श्री महाराजांच्या मुखातून आलेले वचन म्हणजे ब्रह्मवाक्य, त्यात बदल होण्याची सुतराम शक्यता नाही तेव्हा, श्री महाराज आपल्याला सोडून जाणारच या विचाराने भक्त कासावीस झाले.

तत्पूर्वी, एकदा १९३० साली नगर येथील मुक्कामात श्री महाराजांनी समाधिस्थ होण्याचा निर्णय घेतला मात्र तिथल्या भक्तांचे आर्जव लक्षात घेत श्री महाराजांनी त्यांचा निर्णय १७ वर्षांसाठी पुढे ढकलला. पुढे १९४७ साल उजाडले तेव्हा श्री महाराजांनी तोच निर्णय पुन्हा बोलून दाखविला. “यावेळी नगरकर भक्तांप्रमाणेच आपणही श्री महाराजांना कळकळीची विनंती केल्यास ते त्यांचा निर्णय रहित करतील’ असे पुणेकर भक्त मंडळींच्या मनात आले मात्र, या खेपेस श्री महाराज कुणाचे काही ऐकून घेण्याच्या मनःस्थितीत नव्हते. 

त्यामुळे त्यांनी निश्चित केलेला “वैशाख शुद्ध अष्टमी, सोमवार’ चा दिवस उजाडण्याची वाट पाहाणे इतकेच भक्तांच्या हाती काय ते शिल्लक उरले.

वैशाख शुद्ध सप्तमी, सन १९४७. श्री शंकर महाराज सकाळी उठले. चहा झाल्यावर काही वेळाने ते ढेकणे मामींना म्हणाले, “छोटीशी गादी घाला. एक तक्क्या ठेवा. मी आता येथे बसणार आहे. मला कुणाशीही बोलायचे नाही. कुणालाही भेटायचे नाही. तेव्हा कुणाला हे दार उघडू देऊ नका.’ श्री महाराजांनी स्नान केले आणि ते ढेकणे मामांनी आतील खोलीत अंथरलेल्या गादीवर जाऊन बसले. सकाळचे दहा वाजले होते. श्री महाराजांच्या आज्ञेनुसार खोलीचे दार बंद करण्यात आले. ढेकणे मामा-मामी तो दिवस आणि रात्र दाराबाहेरच थांबून होते.

वैशाख शुद्ध अष्टमी. जेमतेम पहाट होते तोवर श्री महाराजांचा संदेश आला, “पुढील सोय करा, ही आत्मज्योत आता बाहेर पडत आहे.’

श्री महाराजांचा निरोप ढेकणे मामांनी नजीकच्या भक्तांपर्यंत पोहोचवला. श्री महाराजांनी देह त्यागला ही बातमी वाऱ्याच्या वेगाने पसरली. श्री महाराजांचे अखेरचे दर्शन घेण्यासाठी ढेकणे मामांच्या घरी भक्तांचा महापूर लोटला. साश्रुपूर्ण नयनांनी सर्वजण श्री महाराजांचे मुखदर्शन घेत होते. प्रत्येकाचा कंठ दाटून आला. श्री महाराजांनी सर्वांवर आईच्या मायेने प्रेम केले आणि तीच आई आज आपल्या बाळांना सोडून निघून गेली होती. कुणी हुंदके देत होते तर कुणी कपाळ बडवून घेत होते. ढेकणे मामांचे घर अक्षरशः दुःखाचा अमर्याद सागर झाले.

श्री महाराजांच्या परगावी राहणाऱ्या भक्तमंडळींना तारा पाठविण्यात आल्या. श्री महाराजांच्या दर्शनार्थ भक्तांचा लोंढा उसळून येत होता. त्यातील अनेकांना श्री महाराजांच्या समाधिस्थ देहाच्या अनेकविध लीला अनुभवण्यास मिळाल्या. श्री महाराजांचा देह रथामध्ये ठेवण्यात आला. अंतयात्रेची तयारी सुरू झाली. श्री शंकर महाराजांना अखेरचा निरोप देण्यासाठी बाबू गेनू चौकामध्ये भक्तांची अभूतपूर्व गर्दी झाली. ढेकणे मामांच्या घरातून निघालेली ही अंतयात्रा काका हलवाई दत्तमंदिराजवळ थांबून पुढे मंडई नजीकच्या श्री अक्कलकोट स्वामी महाराजांच्या मठाजवळ थांबली. श्री महाराजांचे हे नित्यनेमाने येण्याचे स्थान होते. श्री स्वामीरायांचा निरोप घेऊन अंतयात्रा शनिपार व पुढे भिकारदास मारुती मंदिरापाशी आली. रस्त्यावर दुतर्फा श्री महाराजांचे दर्शन घेण्याकरिता शोकाकूल भक्तगण उभे होते. विविधरंगी फुलांनी झाकलेला श्री महाराजांचा देह शांतपणे मार्ग आक्रमीत होता. त्यासोबत चालणाऱ्या भक्तांना दुःखाचा आवेग आवरणे निव्वळ अशक्य होते. टाळ मृदंगाच्या गजरात भजन म्हणत, जयघोष करीत निघालेली ही श्री शंकर महाराजांची लेकरे पर्वती, अरण्येश्र्वर येथून अखेर पद्मावती परिसरात आली. पद्मावती मातेच्या सान्निध्यात काही काळ राहून सर्व भक्तगण समाधीस्थानी पोहोचले. पूज्य श्रीरावसाहेब सहस्त्रबुद्धे व पूज्य श्री मारुतीराव माळी महाराज यांच्यासारखे सत्पुरुष गुरुबंधूला निरोप देते झाले. श्री महाराजांना समाधीस्थानी ठेवण्यात आले व जड अंतःकरणाने त्यांच्या देहावर माती लोटण्यात आली. अशा रितीने, थोर सिद्धसत्पुरुष श्री शंकर महाराज यांच्या देहावताराची समाप्ती झाली.

वास्तविक पाहता, श्री शंकर महाराज सहजसंचारी होते. त्यांचे येणे-जाणे सर्वत्र व सर्वदूर होत असे. मात्र तरीही, त्यांच्या अधिकाधिक वास्तव्याचा काळ सोलापूर, अहमदनगर या भागात होता. पुणे येथे देखील अनेक भक्तांकडे श्रीमहाराजांचे अधूनमधून वास्तव्य होत असे. असे असतानाही श्री शंकर महाराजांनी समाधी घेण्याकरिता पुणे शहराच्या बाहेर सातारा रस्त्यावर, पद्मावती परिसरातील निर्मनुष्य, एकांत स्थळ निवडले. त्याकाळी म्हणजेच, १९५० च्या दशकात पद्मावतीचा परिसर जंगलसदृश होता. श्वापदांचा नित्य वावर या परिसराला नवा नव्हता. पुणे शहराचा विस्तार तेव्हा फार मोठ्या प्रमाणात झाला नसल्याने धनकवडी, पद्मावती परिसर सर्वसामान्यांकरिता तसा अपरिचित होता. मात्र गेल्या तीनेक दशकामध्ये याच परिसराचे रुपडे पालटले आणि आज “धनकवडी’ हे पुणे शहराच्या केंद्रस्थानी आले आहे.

आज “धनकवडी’ येथील श्रीशंकर महाराजांचे समाधीस्थान हे केवळ पुण्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील जागृत स्थानांपैकी महत्त्वाचे “पुण्यक्षेत्र’ मानले जाते. दर महिन्याची दुर्गाष्टमी, श्री शंकर महाराजांची पुण्यतिथी व सण-उत्सवादी कार्यक्रमात हजारो भाविकांची गर्दी येथे पाहावयास मिळते. भक्तजनांना, श्री शंकर महाराजांच्या चैतन्याची अनुभूती करवून देणे हेच या स्थानाचे खरे “माहात्म्य’ आहे.

– विवेक दिगंबर वैद्य (दैनिक सामना , १६/०५/२०२१ )