श्री शंकर महाराज हे एक सिद्ध आणि अवलिया पुरुष इ.स. अठराशेमध्ये प्रकट झाले. श्री सद्गुरू शंकर महाराज कोठे जन्मले, त्यांचे वय काय, त्यांचे आई – वडील कोण, त्यांचे गुरु कोण, या गोष्टींबाबत पुरेशी माहिती उपलब्ध नाही. त्यांच्या खऱ्या वयाचा अंदाज शेवटपर्यंत कोणालाच आला नाही. त्यांचे भक्तगण त्यांना साक्षात शंकराचाच अवतार मानतात. त्यांनी वेगवेगळ्या नावाने वेगवेगळ्या प्रांतात भक्तोद्धार केला. कुठे सुपड्याबाबा तर कोठे कुंवरस्वामी, कोठे रहिमबाबा तर कोठे जॉनसाहेब! ‘अवतरे मी युगी युगी’ या भगवत् वाक्याच्या आधारे श्रींनी कार्य केले.
देहयष्टीने शंकर महाराज आठ ठिकाणी वाकडे असे ‘अष्टवक्र’ होते. त्यांचा वर्ण सावळा असून डोळे टपोरे आणि हिऱ्यासारखे तेजस्वी होते. दाढी, मिशा आणि डोक्यावरचे केस बहुधा अस्ताव्यस्त पसरलेले असत. त्यांच्या मुखावरील हास्य बालकाप्रमाणे निरागस व बोलणे बोबडे असे. कधी भरजरी फेटा, आंगठ्या, कंठा, तर कधी दिगंबर अवस्था! असे महाराजांचे स्वरूप असे. न कळवता यावं व न सांगता जावं हा महाराजांचा परिपाठ असे. चहा, मुगाची खिचडी, सिगारेट या गोष्टींवर त्यांचे विशेष प्रेम असे. अक्कलकोटच्या स्वामी समर्थांना ते गुरु मानत. महाराजांचा भक्तसमुदाय संपूर्ण जगात विखुरलेला आहे.
श्रींनी वैशाख शुद्ध अष्टमी शके १८६९ (सन १९४७), सोमवार या दिवशी लौकिक देह ठेवला. पुणे–सातारा रोडजवळ धनकवडी येथे श्रींची समाधी आहे. सृष्टीच्या नियमाप्रमाणे श्री शंकर महाराज देहाने जरी गेले तरी त्यांचे अस्तित्व व्यापक स्वरुपात अजूनही अनुभवास येते. धावा करताच आपल्या भक्तांसाठी ते धावून येतात. परंतु एकच श्रद्धा निष्ठा आणि भक्ती दृढ पाहिजे.
मै कैलास का रहनेवाला । मेरा नाम है शंकर ॥
दुनिया को समझाने आया । करले कुछ अपना घर ॥
यह दुनिया मे कई रंग है । यह रंग निराला है ॥
पाया न भेद किसने । यह गहराही गहरा है ॥
मुझे वोही जानता है । जो खुद को समझता है ॥
कुर्बान करी भी दौलत । तो भी सवाल अधुरा है ॥
समझे तो समझ ले । बाद मे पछताना है ॥
हमारा क्या बिघडता है । तेराही नुकसान है ॥
लिखी पत्थर की दिवारों पर । सुन्ना की लकीरें ॥
वक्त आने पर याद होंगे । हमारे ही फव्वारे ॥
आरती शंकर श्री गुरूंची । करू या ज्ञानसागराची ।।
उजळल्या पंचप्राण ज्योती । सहजचि ओवाळू आरती ।
मिटवूनी क्षणिक नेत्र पाती । हृदयी स्थितः झाली गुरुमूर्ती ।
श्री गुरु दैवत श्रेष्ठ जनी । जणू का भाविकास जननी ।।
संस्कृती पाश, सहज करी नाश, मुक्त दासास ।
करी कामधेनु आमुची । करू या ज्ञानसागराची ।। १ ।।
आरती शंकर श्री गुरूंची । करू या ज्ञानसागराची ।।
ध्यान हे रम्य मनोहर से । ध्यान धृड जडले नयनिसे ।
भक्त हृदयाकाशी विलसे । तेज ब्रम्हांडी फाकतसे ।
पितांबर शोभवित कटीला ! भक्त मालिका हृद पटला ।।
भक्त जन तारी, नेई भवतीरी, पतित उद्धरी ।
करू नित्य सेवा चरणांची । करू या ज्ञानसागराची ।। २ ।।
आरती शंकर श्री गुरूंची । करू या ज्ञानसागराची ।।
लक्षी जग प्रचंड नीज नयनी । लक्षी ब्रम्हांड हृद्य भुवनी ।।
हरिहर विधी, दत्त त्रिगुणी । आठवी नित्यभूवन सुमनी ।।
दत्तमय असे योगिराणा । ओम कारीचे तत्व जाणा ।।
धारा दृढचरण, दास उद्धरण, जनार्दन शरण ।
आस पुरवावी दासांची । करू या ज्ञानसागराची ।। ३ ।।
आरती शंकर श्री गुरूंची । करू या ज्ञानसागराची ।।